धर्मराज काडादी दक्षिणमधून निवडणूक लढविणार ; सिद्धेश्वर परिवाराच्या बैठकीत शिक्कामोर्तब
सोलापूर : सोलापूरच्या राजकारणातील सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणाऱ्यांना सुद्धा हा मोठा धक्का असून त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून तयारी केलेले अमर पाटील यांनाही हा धक्का आहे. तो धक्का म्हणजे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज सोमवारी काडादी यांच्या गंगा निवासस्थान या ठिकाणी सिद्धेश्वर परिवाराची बैठक स्वतः काडादी यांनी बोलावली आणि त्यांनी स्वतः दक्षिण लढवण्याची इच्छा उपस्थित मान्यवरांसमोर बोलून दाखवली. या बैठकीत सर्वांनीच होकार दिला असून या बैठकीनंतर संपूर्ण सिद्धेश्वर परिवार काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या जाई जुई फार्म हाऊस येथील गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेले असून त्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यासोबत याप्रकरणी चर्चा होणार असल्याचेही समजले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिण, उत्तर, अक्कलकोट या तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना समजला जाणाऱ्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडण्यात आली. ही चिमणी भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर पाडली गेली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर शेतकऱ्यांचा प्रचंड रोष निर्माण झाला आहे. तोच रोष लोकसभा निवडणुकीत ही दिसून आला आणि त्यामुळे धर्मराज काडादी यांच्याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आपुलकी निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
सध्या काँग्रेस पक्षाकडून सुमारे 18 ते 20 जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि काँग्रेस पक्षातील प्रत्येक गटाकडून एकमेकाला विरोध होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे धर्मराज काडादी हे जर उमेदवार म्हणून पुढे आले तर 75 ते 90 टक्के विरोध कमी होईल अशी चर्चा दक्षिण मध्ये ऐकण्यास मिळते. त्यामुळे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी सुद्धा धर्मराज काडादी यांची उमेदवारी निश्चितच धोकादायक असणार यात कोणतीही शंका नाही.