सोलापूर : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाची याचिका फेटाळत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे 16 ही आमदार पात्र ठरवले. त्यामुळे त्याचे पडसाद सध्या महाराष्ट्रात उमटले आहेत. सोलापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहेत.
जिल्हाप्रमुख गणेश वानकर, जिल्हाप्रमुख अजय दासरी, जिल्हाप्रमुख अमर पाटील, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, शिवसेना नेते प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, लहू गायकवाड यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येऊन त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचा निषेध नोंदवला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस व राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमा पायदळी तुडवल्या यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्या प्रतिमा हातात घेऊन बाजूला नेल्या.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद आम्ही विरोधकांना दाखवून देऊ त्यांची मस्ती जिरवू असा इशारा अजय दासरी व गणेश वानकर यांनी दिला.