मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षामध्ये सर्वात मोठा निकाल हाती आला असून ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 16 आमदार पात्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ठाकरे गटाची अपात्रतेची याचिका त्यांनी फेटाळली. मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता देतो असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, आज शिवसेना कोणाची याबाबत राहुल नार्वेकर निकालाचे वाचन करत आहेत. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. 23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेत अंतर्गत निवडणूक झाली नाही, असं निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे. 21 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट पडले. शिवसेनेत दोन गट पडल्याचं 22 जून रोजी लक्षात आलं. नेतृत्त्वाची रचना तपासण्यापुरताच पक्षघटनेचा आधार असून खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच, असे राहुल नार्वेकर म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल सुनावतील. पण राहुल नार्वेकर कोण आहेत ते पाहुया. नार्वेकर हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करत 2019 रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी ते 2014 ते 2019 या काळात विधान परिषदेवर राष्ट्रवादीकडून आमदार होते. तसेच ते 2019 साली भाजपच्या तिकिटावर कुलाबा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले. सर्वात आधी खरी शिवसेना कोणाची यावर निर्णय देणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. तसेच, त्यानंतर आमदार अपात्रतेवर निर्णय देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निकाल वाचनाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी 1999 ची शिवसेनेची घटना ग्राह्य धरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
2018 सालची घटना ग्राह्य धरण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. पण, 2018 सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची 1999 सालची घटना असून तीच ग्राह्य धरली जाईल, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. 2018 सालची घटना ग्राह्य धरा ही ठाकरे गटाची मागणी अमान्य करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचा व्हिप मान्य केला आहे. त्यांनी उध्दव ठाकरे गटाचा व्हीप अमान्य केला आहे. यासोबतच भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यामुळे गोगावलेंचा व्हिप योग्य असल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षाच्या कार्यकारिणीचा निर्णय हा अंतिम असल्याचं म्हणत, पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम असल्याचा दावा राहुल नार्वेकरांनी फेटाळला आहे. यासोबतच शिवसेना पक्षप्रमुख हे कुणालाही पदावरुन काढू शकत नाहीत, असंही अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. यामुळेच एकनाथ शिंदेंची हकालपट्टी अमान्य असल्याचं ते म्हणाले. ● हे सोळा आमदार पात्र ठरले आहेत. 1) एकनाथ शिंदे, 2) चिमणराव पाटील, 3) अब्दुल सत्तार, 4) तानाजी सावंत, 5) यामिनी जाधव, 6) संदीपान भुमरे, 7) भरत गोगावले, 8) संजय शिरसाठ, 9) लता सोनवणे, 10) प्रकाश सुर्वे, 11) बालाजी किणीकर, 12) बालाजी कल्याणकर, 13) अनिल बाबर, 14) संजय रायमूळकर, 15) रमेश बोरनारे, 16) महेश शिंदे