मुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत चंद्रकांत पाटलांचे चॉकलेट ; स्वागताच्या अनोख्या पद्धतीमुळे वाढला गोडवा
मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चॉकलेटची कायम चर्चा होत असते. आता तर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून ते विरोधी पक्षनेते पर्यंत चॉकलेट देऊन स्वागत केल्याची चर्चा विधिमंडळ अधिवेशन मध्ये होऊ लागली आहे.
आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनात संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहत आपल्या कार्यालयात श्रीगणरायाची पूजा केली. अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे प्रयत्न सफल व्हावे, अशी श्रीगणरायांच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी विधी मंडळातील सर्व प्रमुख मंत्र्यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधान भवनात दाखल झालेले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे संसदीय कार्यमंत्री या नात्याने स्वागत केले. यासोबतच विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांचे देखील संसदीय कार्यमंत्री या नात्याने स्वागत केले. अधिवेशन कामकाजात जनहिताच्या मुद्द्यांवर सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील संसदीय कार्यमंत्री या नात्याने स्वागत केले. यासोबतच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे विधान भवनात स्वागत केले.