सोलापूर : महाराष्ट्राला कलेचा समृद्ध वारसा आहे. विद्यार्थ्यांनी शतकोत्सवी विभागीय नाट्य संमेलनात सहभागी व्हावे आणि नाट्य कलेच्या माध्यमातून हा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले.
शतकोत्सवी विभागीय नाट्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन संमेलनाची माहिती दिली. सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी नाट्यसंमेलनात हिरहिरीने भाग घेऊन आपली कला सादर करावी असे आवाहन यावेळी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी केले.
संमेलनाचे समन्वयक मोहन डांगरे म्हणाले, या विभागीय नाट्य संमेलनात एकांकिका, बालनाट्य, नाट्यछटा, समूहनृत्य आदी कलाप्रकार सादर होणार आहेत. कलाविष्कार सादर करण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने सोलापूरकरांना प्राप्त झाली आहे.
यावेळी शतकोत्सवी विभागीय नाट्यसंमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके, संमेलनाचे समन्वयक मोहन डांगरे, कोषाध्यक्ष दिलीप कोरके, नियमक मंडळ सदस्य सुनील फुलमामडी, समन्वयक कृष्णा हिरेमठ, किरण लोंढे, आशुतोष नाटकर, किरण फडके, मिलिंद पटवर्धन, सृष्टी डांगरे आदी उपस्थित होते.