सोलापुरात देवेंद्र कोठे यांच्यावर गुन्हा दाखल ; ते भडक भाषण आले अंगलट
आमदार राम सातपुते यांच्यासाठी सोलापुरातील कर्णिक नगरच्या लिंगराज वल्याळ मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत देवेंद्र कोठे यांचे भाषण झाले होते. त्या भाषणात त्यांनी मुस्लिम धर्मियांविषयी भावना दुखावणारे विधान केले होते.
माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या विरोधात मुस्ताक महबूब शेख यांनी जेल रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. एक मे रोजी घडलेल्या गुन्ह्या प्रकरणी देवेंद्र कोठे यांच्यावर 17 मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
गोरक्षकांचे रक्षण करण्यासाठी आगामी काळात कडक कायदा निर्माण करण्यात यावा, अशी मागणी देवेंद्र कोठे यांनी केलली होती. त्या भाषणात बोलताना त्यांनी मुस्लिम धर्मियांविषयी भावना दुखावणारे विधान केले होते. तसेच, राहुल गांधी यांच्या महिलांना एक एक लाख रुपये देण्याच्या विधानाचा मुस्लिम धर्मियांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न कोठे यांनी केला होता.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार राम सातपुते, तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूने आरोप- प्रत्यारोपांचा धुराळा उडाला होता. या प्रचाराच्या दरम्यानच देवेंद्र कोठे यांनी हे धार्मिक भावना दुखावणारे विधान केले होते.
देवेंद्र कोठे हे सोलापूरचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते महेश कोठे यांचे पुतणे आहेत. ते माजी नगरसेवक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र कोठे यांनी नागपूर येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात आक्रमक प्रचार केला आहे.