सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त पी शिवशंकर यांनी आपले सुमारे 854 कोटीचे प्रशासकीय बजेट गुरुवारी पत्रकारांसमोर सादर केले यामध्ये सोलापूर महानगर पालिकेला विविध बाबींनी पासून मिळणारे उत्पन्न 744 कोटी 87 लाख 63 हजार एवढे दाखवण्यात आले आहे तर भांडवली कामांसाठी उपलब्ध होणारी रक्कम 109 कोटी सतरा लाख इतकी दाखवण्यात आली आहे.
तसेच या बजेटमध्ये केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान 187 कोटी 90 लाख इतके दाखवण्यात आले आहे.
महापालिका आयुक्तांनी आपल्या बजेटमध्ये कोणते ठळक मुद्दे मांडले आहेत पहा ते खालील प्रमाणे
सोलापूर शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामे प्रगतीपथावर आहेत. सोलापूर महानगरपालिका हद्दीचा विकास होण्याच्या दृष्टीने व नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी व आकर्षित करण्यासाठी महानगरपालिका सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक करतेवेळी यासाठी उपाययोजना व निर्णय होणे आवश्यक आहे.
महानगरपालिका ज्या वेगवेगळ्या बाबीवर खर्च करते तो खर्च महानगरपालिकेच्या महसुली उत्पन्नातून भागविला जातो. उत्पन्नाच्या प्रमुख बाबी म्हणजे विविध कर, पाणीपट्टी, भाडे, मालमत्ता हस्तांतरण शुल्क, विकास शुल्क बांधकाम परवाना शुल्क इत्यादी आहेत. उत्पन्नाच्या मानाने वेगवेगळ्या बाबींवर होणारे खर्चाचे प्रमाण वाढलेले आहे, विशेषतः आस्थापना खर्च, परिवहन उपक्रमाचे देणे यामुळे आर्थिक शिस्त व काटकसरीचे धोरण अवलंबावे लागणार आहे.
करापासून उत्पन्न:
सोलापूर शहर परिसर पर्जन्यछायेचा व दुष्काळी भाग आहे. येथील सरासरी पर्जन्यमान्य ५४५ मि.मी. इतके आहे. तसेच सोलापूर शहरास उजनीतून पाणीपुरवठा हा साधारणत: १०० कि.मी. लांबीच्या पाईपलाईन मधून होतो. याकरीता पाण्याचा सुयोग्य वापर होणे आवश्यक आहे. त्यामुळे पावसाचे पाणी फिल्टर करून कुपनलिकेत सोडणाऱ्या (Rain Water Harvesting) मिळकतधारकांसाठी मिळकत करामध्ये २% सुट, पावसाचे पाणी संपामध्ये साठवणे व त्याचा पुनर्वापर करणे (Rain water Storage) यासाठी मिळकत करामध्ये ३% सुट तसेच उर्जाबचतीसाठी सौरउर्जाचा वापर करणाऱ्या मिळकत कर धारकांसाठी मिळकत करामध्ये ५% सुट यापुढे ही देण्यात येत आहे..
शहरातील मालमत्तांच्या बाबतीत ज्या त्या भागांनुसार भांडवली मुल्यवर्धित कर लागू करण्याचे प्रस्तावीत आहे. यामुळे मिळकत करामध्ये समानता येऊन कर आकारणीमध्ये सुसूत्रता व पारदर्शकता निर्माण होणार आहे.
भूमी व मालमत्ता विभाग
सोलापूर शहरातील महानगरपालिकेच्या मालकीची निरनिराळे भूखंड, इमारती व जागा निरनिराळ्या व्यक्ती व संस्थांना भुईभाड्याने अथवा भाड्याने देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ७९ (ड) नुसार चालु बाजार भावापेक्षा कमी नाही अशा भाड्याने अथवा विक्री करणे कायद्याने बंधनकारक असल्याने यापूर्वी अशा ज्या जागा अथवा इमारती नाममात्र दराने भाड़ेने दिलेल्या आहेत अशा जागांबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्र. ३३६ दि.१३ सप्टेंबर २०१९ नुसार रेडीरेकनर प्रमाणे भाडे वसूल करणेची प्रक्रिया चालु आहे. त्यामुळे भूमी व मालमत्ता विभागाकडून जास्तीचे उत्पन्न अपेक्षित आहे.
महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या ओपन जागेवर पे अॅन्ड पार्क, फूड पार्क तसेच मनपाच्या इमारतीचा व्यापारी तत्वावर उपयोग करून उत्पन्न वाढविणेचा मानस आहे. तसेच शहरात मंजूर ठिकाणी असलेले जाहिरात होर्डिग, गॅन्टरिंज इत्यादींचे ई-टेंडरींग करून त्यामाध्यमातून ही महापालिकेस अधिकचे उत्पन्न प्राप्त होणार आहे.
नगररचना विभाग
सोलापूर शहरामध्ये १) जुना पुणे नाका ते नविवेस पोलीस चौकी ते भैय्या चौक ते रेल्वे स्टेशन ते सात रस्ता ते पत्रकार भवन, २) ए.पी.एम.सी.मार्केट गेट ते जुना बोरामणी नाका ते अशोक चौक ते गुरूनानक चौक ते महावीर चौक ते पत्रकार भवन असे दोन फ्लाय ओव्हरची कामे राष्ट्रीय महामाग्र प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. सदरच्या कामासाठी पूर्वीच्या प्लॅननुसार २.२.२९९ कोटी खर्च लागणार होता. त्यास महापालिकेचा हिस्सा र.रु.८९.७० कोटी इतका भरावा लागणार होता. तथापि सदर योजनेसाठी सुधारीत आराखड्यानुसार भूसंपादनासाठी अंदाजे र.रू.११७.०० कोटी इतका खर्च अपेक्षित असून, त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून ७०% र.रु.८१.९० कोटी व मनपा ३०% हिस्सा र.रु.३५.१० कोटी इतकी रक्कम लागणार आहे. त्यामुळे महापालिकेची र.रु.५४.६० कोटीची बचत झालेली आहे. तसेच GIS Based Development प्लॅन करण्याचे टेंडरमध्ये ही महापालिकेची र.रू.९.५० कोटीची बचत होणार आहे.
हरित इमारत (Green Building)
हरीत इमारतीना स्टार रेटिंगनुसार इमारत विकास शुल्कात सिल्वर साठी २.५०%, गोल्डसाठी ५.००% व प्लॅटिनमसाठी ७.५०% सुट यावर्षीही चालु ठेवणार आहोत.
नगरअभियंता
मंजूर विकास आराखड्यानुसार निश्चित झालेल्या आरक्षणा प्रमाणे खाजगी जागा, टी.डी. आर. माध्यमातुन महानगरपालिकेकडे वर्ग झालेल्या आहे. त्या जागा महानगरपालिकेकडून आरक्षणानुसार विकसित होणे आवश्यक आहे. शहरातील विविध माध्यमातून महानगरपालिकेकडे हस्तांतरण झालेल्या मोकळ्या जागे बाबत संबंधीत जागेच्या डी.पी.आर. नुसार बांधून ई-ऑक्शनच्या माध्यमातुन देकार मागवून दीर्घ मुदतीने भाड्याने देवून उत्पन्न प्राप्त करून घेण्याचा मानस आहे.
शहरातील पावसाळी पाणी वाहुन जाण्यासाठी नवीन ३० खुले नाले बांधणेकामी DPR तयार करणेत आलेला आहे.
महानेट प्रोजेक्ट अंतर्गत मनपाच्या सर्व कार्यालयास केबलद्वारे नेट कनेक्टीव्हिटी उपलब्ध करून देण्याचे प्रक्रिया चालु आहे. रेकॉर्ड कॉम्पॅक्टर : महानगरपालिकेचे अभिलेखे महत्वपूर्ण असल्याने ते जतन करणेसाठी कॉम्पॅक्टर युनिट बसविणे आवश्यक होते. त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेचे सर्व अभिलेखे जतन करणे तसेच सदरचे रेकॉर्ड सुस्थितीत ठेवणेसाठी स्वतंत्र अभिलेख कक्ष तयार करून त्यामध्ये रेकॉर्ड कॉम्पॅक्टर ची व्यवस्था करून त्यामध्ये खातेनिहाय सर्व अभिलेखे ठेवण्यात येत आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभाग
घनकचरा डेपोमधील सर्व कचरा प्रक्रिया करून Biomining करणे, तसेच specialized land filling करणे त्याचबरोबर सदरची जागा मोकळी करून सुशोभिकरण करण्याचा त्याचबरोबर सोलापूर सर्व C&D waste करिता Processing Unit तयार करण्याचा व विविध प्रकारचे ४ Transfer Station बांधकाम करणेचा प्रकल्प प्रस्तावीत आहे.
ज्या सोसायटी किंवा मोठ्या अपार्टमेंट ओल्या व सुक्या कचन्याचे विलिगीकरण करतील त्या सोसायटी किंवा अपार्टमेंटला उपविधी (स्वच्छता) करामध्ये सुट देणे योग्य होणार आहेत.
पाणीपुरवठा :
अमृत २० मधून २४x७ पाणीपुरवठा करणेकामी WAPCOS Company कडून Hydrolic Modelling व Water Audit तयार करून घेण्याचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत चालु आहे. सध्या Wapcos Company ने दोन फेज मध्ये कामाचे अंदाजे एस्टिमेट खालील प्रमाणे प्रमाणे आहे.
फेज-1 र.रु.४१० कोटी
फेज ॥ र.रु.२०५ कोटी
वरील काम WAPCOS चे design प्रमाणे केले तर शहरास दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होईल. तसेच शहराचा प्रवास टँकरमुक्तीच्या दिशेने चालु असून भविष्यात शहर टँकरमुक्त होईल.
आरोग्य विभाग
कोरोना उपाय योजनेअंतर्गत महानगरपालिकेचे बॉईज हॉस्पिटल येथे ७० बेडचे DCHC तयार करण्यात आलेले आहे.
विडीघरकुल येथे प्रसुतीगृह तयार करण्यात आलेले आहे. तसेच शहराच्या लोकसंख्येनुसार नवीन UPHC तसेच महापालिकेच्या सर्व प्रसुतीगृहांचे आधुनिकिकरण करणे इ. कामे शासन निधीतून प्रस्तावीत आहेत. त्याचबरोबर दोन PSA Plant तसेच एक LMO Plant तयार करण्यात आलेले आहे. तसेच CSR फंडातून MSEDCL कडून र.रू.१.३४ कोटी, कॅनरा बँकेकडून र.रु.८.०० लाख वखार महामंडळाकडून र.रू. २.०० लाख बालाजी सरोवरकडून र.रु.९.०० लाख याप्रमाणे निधीतून विविध आरोग्य साहित्य प्राप्त झालेले आहे. तसेच रूपाभवानी येथे र.रू.१.१० कोटीची विद्यूत दाहिनी बालाजी अमाईन्स कडून प्राप्त झालेले आहे.
उत्पन्न वाढीचे उपाय योजना :
सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून जुना पुणे नाका येथील मनपा जागा, मनपाचे २७ नंबर शाळा या जागांचे, व्यापरी तत्वावर विकास करून महापालिकेस उत्पन्न प्राप्त होणार आहे..
स्क्रॅप विक्री महानगरपालिकेकडील सर्व जुने स्क्रॅपचे ऑक्शन करून त्यामधून सोलापूर महानगरपालिकेस सुमारे र.रु.३.५० कोटीचे उत्पन्न प्राप्त होणार असून, सद्यस्थितीमध्ये सुमारे र.रु.२.०० कोटीचे उत्पन्न प्राप्त झालेले आहे.


















