सोलापूर : सोमवारी शिक्षक संघटनेच्या आंदोलनात संघटनेचे नेते शिवानंद भरले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर बाबत संविधानिक भाषा वापरून एकेरी उल्लेख करत अपमानित करण्याचा प्रयत्न केला होता. दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या शिक्षण विभागाच्या दशसूत्रीवर भाष्य करताना अन्यथा.., दशसूत्री ही कापडात गुंडाळून फेकून देऊ अशीही भाषा वापरली होती.
दरम्यान या घटनेचा शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेने तीव्र असा निषेध नोंदवला आहे. बुधवारपासून काम बंद केले असून याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना दिले आहे.
या निवेदनात वाचाळ शिवानंद भरलेंवर तात्काळ कारवाई करा अन्यथा आम्ही काम बंद सुरूच ठेवू असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना, स्वाभिमान परिवर्तन परिवारचे अनिल कादे यांनी दशसूत्री या उपक्रमाचे कौतुक करताना आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीर असल्याचे सांगितले आहे. प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीचे राजकारण या निमित्ताने चांगलेच तापले आहे. शिवानंद भरले यांच्या गुरुसेवा पॅनलचे चिन्ह विमान असून आता त्यांचे विमान चांगलेच उडवून लावण्याची भाषा शिक्षण विभागातून होत आहे.


















