भाजपच्या लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव राष्ट्रवादीच्या संपर्कात ; या मतदारसंघातून आहेत इच्छुक
सोलापूर : “आता जगायचे तर भाजप मध्येच आणि मारायचे तर भाजपमध्येच” अशी भाषा काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली होती. पण त्यांचेच चिरंजीव अभिजित ढोबळे हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून ते मोहोळ मतदारसंघातून इच्छुक आहेत.
अभिजित ढोबळे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांची जिल्हा परिषदेमध्ये भेट घेतली. अभिजित ढोबळे अन् काकांच्या भेटीला हे पाहिल्यानंतर पत्रकारांनी तो फोटो लगेच टिपला.
लक्ष्मण ढोबळे यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या कन्या कोमल ढोबळे यांच्यासाठी भाजप कडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केला, कोमल यांनी तर बीआरएस पक्षाचे अध्यक्ष केसीआर यांची भेट ही घेतली होती.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडी कडून इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. ग्रामीण भागातून तुतारी हाती घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून अभिजित ढोबळे यांनी राष्ट्रवादी कडे उमेदवारी मागितल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी 2009 मध्ये लक्ष्मणराव ढोबळे यांनी मोहोळ विधानसभा लढवली होती. त्यांनी पाच वर्ष प्रतिनिधित्व केले आहे. अभिजित ढोबळे यांना राजकारणात स्टँड करण्यासाठी सरांचा प्रयत्न सुरू आहे.