सोलापुरात अमर साबळे, राम सातपुते की विजयकुमार देशमुख ; का पुन्हा शरद बनसोडे किंवा विद्यमान खासदारांनाच मिळणार संधी
सोलापूर : काँग्रेसच्या आमदार तथा सोलापूर लोकसभेच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपला प्रचार जोरदारपणे सुरू केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांचे कार्य पाहता त्यांच्या तोडीस तोड भारतीय जनता पार्टीकडे सध्या तरी कोणी उमेदवार नाही त्यामुळे सोलापूर राखीव लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवाराची अजूनही घोषणा होताना दिसत नाही.
भारतीय जनता पार्टीकडून सोलापूर साठी माजी खासदार अमर साबळे, आमदार राम सातपुते, लिंगायत समाजाचे नेते असतानाही त्यांच्याकडे अनुसूचित जातीचा दाखला असल्याची चर्चा असल्याने माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांची नाव समोर येत आहेत.
सोलापूर शहर जिल्ह्यातून यंदा स्थानिक आणि अनुसूचित जातीचा ओरिजनल उमेदवार देण्याची मागणी भाजपकडे होताना दिसत आहे. बुधवारी भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तसेच महाराष्ट्रातील अनेक विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळाली असल्याने पुन्हा सोलापूर साठी विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना किंवा माजी खासदार शरद बनसोडे यांना उमेदवारी जाहीर होते का अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांचा दौरा केला त्या ठिकाणी सुरुवातीला मराठा समाजाने विरोध केला मात्र नंतर त्यांच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवेढ्याच्या दौऱ्यानंतर त्यांनी आता मोहोळ तालुक्याचा दौरा सुरू केला आहे. तिथेही त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. काही ठिकाणी मराठा समाजाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या उलट मराठा समाजाच्या बाजूनेच घोषणा देत असल्याने समाजही काही करू शकलेला नाही. त्यांचे झंजावाती दौरे, युवकांमधून तसेच महिलांमधून मिळत असलेल्या प्रतिसाद पाहून भारतीय जनता पार्टीला त्यांच्या विरोधात उमेदवार देताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
सोलापुरातील स्थानिक अनुसूचित जातीचा ओरिजनल उमेदवार आता कोण राहणार अशी सुद्धा चर्चा असून स्थानिकांमध्ये संपादक दिलीप शिंदे, बक्षी हिप्परगा गावचे सरपंच विश्रांत गायकवाड तसेच कॉन्ट्रॅक्टर मुगळे हे इच्छुक आहेत. त्यामुळे भाजप सोलापूर राखीव मधून कोणाला उमेदवारी देतोय याची उत्सुकता लागली आहे. बुधवारी भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यक्रम सोलापूर शहरात होते त्या प्रत्येक कार्यक्रमाला विद्यमान खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी हजेरी लावली त्यामुळे पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळणार का अशी शक्यता ही आता वर्तवली जात आहे.