अभिषेक कदम खूनप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या तालुकाध्यक्षास जामीन
सोलापूर | दि. २० :
पंढरपूर शहरातील बहुचर्चित अभिषेक कदम खूनप्रकरणातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तालुका अध्यक्ष संदीप मांडवे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.
अभिषेक कदम हा अनिल नगर, पंढरपूर येथे गेला असता, त्याचा नवनाथ अटकळे, मेहुणा सागर शिंघण, पुतण्या अमोल अटकळे तसेच नातेवाईक संदीप मांडवे यांनी शारीरिक व मानसिक छळ करून ठार मारल्याचा आरोप आहे. तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत रेल्वे रुळावर टाकल्याची फिर्याद अभिषेकचे वडील अशोक कदम (रा. तारापूर, ता. पंढरपूर) यांनी शहर पोलिस ठाण्यात नोंदवली होती.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने २१ मे २०२५ रोजी संदीप मांडवे याला अटक केली होती. त्यानंतर तपास पूर्ण करून पोलिसांनी पंढरपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दोषारोपपत्र दाखल केले.
दरम्यान, संदीप मांडवे याने जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो नामंजूर झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सदर जामीन अर्जाची सुनावनी न्यायमूर्ती. एस.जी. दिघे साहेबांसमोर झाली. यांत पक्षांतर्फे युक्तीवाद झाल्यानंतर न्यायमुर्तींनी आरोपीस जामीनावर सोडण्याचे आदेश केले. यांत अर्जदार आरोपी मांडवे यांच्यातर्फे अॅड. विक्रांत फताटे व अॅड. अमोल देसाई तसेच सरकारपकातर्फे ॲड. वीरा शिंदे तर मुळ फिर्यादीतर्फे ॲड. सचिन भंवर यांनी काम पहिले.