भाजपचा खासदार नाही शिवसेनेचा लहान भाऊ म्हणून काम करेन ! शिवसेना नेत्यांच्या भेटीत राम सातपुते यांचे वचन
सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून आमदार राम सातपुते यांचे अधिकृत घोषणा झाली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज चौकात सातपुते यांचे भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
सोमवारी दुपारी बारा वाजता सातपुते यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राम सातपुते यांचे स्वागत केले. यावेळी हरिभाऊ चौगुले, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी नगरसेवक अनंत जाधव, संजय सरवदे, राजू शिंदे, सुनंदा साळुंके, मनिषा नलावडे, जयश्री पवार, पुजा चव्हाण, अश्विनी भोसले, अनिता गवळी यांच्यासह महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना राम सातपुते यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. ही लढाई सरळ सरळ विचारांची आहे. मला उपरा उमेदवार म्हणून हिणवले जात आहे पण सुशीलकुमार शिंदे हे पण उपरे आहेत. प्रणिती शिंदे या सोलापूरची लेक नसून मुख्यमंत्र्यांची लेक असल्याची टीका त्यांनी केली. खासदार झाल्यानंतर खासदार म्हणून नाही तर शिवसेनेचा लहान भाऊ म्हणून मी काम करेन अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रारंभी अमोल शिंदे यांनी स्वागत करताना सोलापूर ही कामगारांची नगरी आहे आणि एका कामगारांच्या मुलाला भाजपने उमेदवारी देऊन समस्त सोलापूरच्या कामगारांचा गौरव केल्याचे सांगत शिवसेना तन,मन, धनाने भाजप सोबत राहील असे वचन त्यांनी दिले.