भाजपचा स्थानिक अन् ओरिजनल उमेदवार पाहिजे ना मग घ्या शरद बनसोडेच ; गिरीश भाऊंच्या दौऱ्यात मालकांनी केले फायनल?
सोलापूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या दोन दिवसात लागेल. भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. त्याला कारणेही तशीच आहेत. यंदा सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीने स्थानिक आणि ओरिजनल अनुसूचित जातीचा उमेदवार द्यावा अशा मागणीने मागील काही महिन्यांपासून जोर धरला आहे.
विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या बनावट दाखल्याचा मुद्दा ऐरणीवर आला त्यामुळे भाजपची प्रचंड बदनामी झाली म्हणूनच भाजपच्या स्थानिक आणि ओरिजनल उमेदवाराच्या मागणीला महत्त्व आले आहे.
दुसरीकडे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांना त्यांच्या कामाच्या जोरावर युवक, महिला आणि ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सोलापूर बाहेरील उमेदवार यावेळी चालणार नाही अशी चर्चा सोलापूरकरांसह खुद्द भाजपच्या कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे अनुसूचित जातीचा दाखला असल्याचे सांगितले जात असल्याने त्यांना उमेदवारी मिळेल अशा ही चर्चांनी जोर धरला होता. परंतु मालक हे लिंगायत समाजाचे असल्याने आणि सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी असल्याने लिंगायत समाजातूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध झाल्याचे समजते. त्यामुळे स्थानिक आणि ओरिजनल उमेदवार द्यायचा कोण? असा प्रश्न भाजपा समोर उभा राहिला आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले. त्यांच्या संपूर्ण दौऱ्यात आमदार विजयकुमार देशमुख त्यांच्या सोबत होते. दुपारी भारतीय जनता पार्टीच्या एका माजी नगरसेवकाच्या निवासस्थानी गिरीश महाजन यांच्यासाठी भोजनाचे नियोजन करण्यात आले होते. त्यावेळी गिरीश महाजन, विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित नेत्यांमधून चर्चा झाली की, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर बाहेरून आयात उमेदवार नको. स्थानिक आणि ओरिजनल अनुसूचित जातीचा उमेदवार अशी मागणी होत आहे.
त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून खासदार झालेले शरद बनसोडे स्थानिक सोलापूरचे असून ते बौद्ध समाजाचे आहेत. म्हणून त्यांचीच उमेदवारी निश्चित करावी म्हणजे सोलापूरकरांच्या मागणीचा विषय संपून जाईल. अशी माहिती खात्रीशीर सूत्रांकडून समजली आहे. त्यामुळे पक्षातील मालक विरोधी गटांकडून पुढे करण्यात आलेल्या उमेदवारापेक्षा “दगडापेक्षा वीट बरी” म्हणून माजी खासदार एडवोकेट शरद बनसोडे हेच उमेदवार म्हणून असावेत अशी भूमिका मालक गटाची असल्याचे सांगण्यात येत आहे.