उर्दू घराच्या लोकार्पणाचा मान मिळाला अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांना ; मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ
सोलापूर, दिनांक 7(जिमाका):- अल्पसंख्यांक विकास विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सिव्हिल चौक येथे सोलापूर उर्दू घरची उभारणी करण्यात आलेली होती. या उर्दू घरचे उद्घाटन व लोकार्पण अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या हस्ते आज झाले,
राज्याच्या अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व आमदारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते परंतु या लोकार्पण सोहळ्याला एक ही मंत्री आणि एकही लोकप्रतिनिधी उपस्थित राहिला नाही.
यावेळी उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने, जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर, तहसीलदार उज्वला सोरटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ठाकरे, आसिफ इकबाल, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सी ए बिराजदार, डॉ. मोहम्मद शफी चोबदार, उर्दू कवी बशीर परवाज, उर्दू घरचे ग्रंथपाल शाहीर नदाफ आदी उपस्थित होते.
उर्दू भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्व सोलापूरकर नागरिकांनी उर्दू घराची उभारणी करण्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. विद्यार्थ्यांनीही उर्दू भाषा शिकून घ्यावी. तसेच या ठिकाणी उर्दू भाषेतील विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे. पुढील काळात हे उर्दू घर जिल्ह्यात उर्दू भाषेच्या संवर्धन व प्रसारात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी केले.
अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग पुढे म्हणाल्या की, सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर उर्दू शाळा, उर्दू महाविद्यालय तसेच उर्दू भाषिक यांची संख्या आहे. सोलापूरकर नागरिक हे उर्दू भाषेवर भरभरून प्रेम करतात. त्यामुळे शासनाने सोलापूर शहरात उर्दू घराची उभारणी केलेली असून येथील ग्रंथालयाचा जास्तीत जास्त नागरिक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
उर्दू घराचा वापर उर्दू भाषेचे अभ्यासक्रम व कार्यक्रम यासाठीच व्हावा अशी अपेक्षा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदूने यांनी व्यक्त केली. उर्दू घरचे सदस्य डॉक्टर मोहम्मद यांनी उर्दू भाषा ही सर्वांना एकत्र जोडणारी भाषा असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात एम.ए. पानगल उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली. तर उर्दू घरचे सदस्य असिफ इकबाल यांनी सोलापूरचा उर्दू इतिहास सांगितला. यावेळी उर्दू कवी बशीर परवाज यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या हस्ते फीत कापून उर्दू घराचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर उर्दू भाषिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहमूद नवाज यांनी केले तर आभार राजा बागवान यांनी मानले.