सोलापूर : काँग्रेस पक्षाच्या माजी महिला शहराध्यक्ष, एकेकाळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा तितक्याच ताकतीने सांभाळणाऱ्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटांमध्ये प्रवेश केला आहे. त्यांची वक्तृत्वशैली आणि अभ्यास पाहून त्यांच्यावर प्रदेश प्रवक्ते पदाची मोठी जबाबदारी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याची माहिती मिळत आहे.
सोलापूरच्या मोची समाजातील ज्योती वाघमारे या अतिशय अभ्यासू व उत्कृष्ट वक्त्या समजल्या जातात. त्यांचा अभ्यास आणि वक्तृत्व पाहून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्यावर महिला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती परंतु त्यांना काम करताना पक्षातीलच काही महिला कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक त्रास दिला. त्यामुळे त्यांना पद सोडावे लागले तरीही त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराची मोठी बाजू सांभाळली. त्यांच्या विजयात वाटा उचलला.
दरम्यानच्या काळात एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या स्टेजवर त्या सूत्रसंचालन करताना दिसून आल्या होत्या त्यामुळे त्या वंचित मध्ये जातील अशीही चर्चा होती पण त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान राज्यात सत्तांतर झाले, शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली, प्राध्यापिका सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या उपनेते पदाची जबाबदारी स्वीकारत राज्यभर दौरे केले. सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. त्यामुळे त्या राज्यात चर्चेचा विषय बनल्या आहेत.
अंधारे यांच्याच तोडीला तोड म्हणून आता प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेत घेऊन पक्षाची बाजू बळकट केली आहे. अंधारे नंतर वाघमारे यांची तोफ धडाडणार असून आता राज्यामध्ये सुषमा अंधारे विरुद्ध ज्योती वाघमारे असा निश्चितच अभ्यासू सामना पाहायला मिळणार हे मात्र नक्की आहे.


















