सोलापूर : किशोर शांताबाई काळे हे नाव ‘ कोल्हाट्याचं पोर’ या आत्मचरित्रामुळे संपूर्ण महाराष्ट्राला माहित झालेलं. किती कष्टातून त्यांच्या आईने त्यांना शिकवले, मोठे डॉक्टर केले हे सर्व कोल्हाट्याचे पोर सांगून जाते. परंतु किशोर काळे यांचे दुर्दैवाने अपघाती निधन झाले आणि त्यांच्या आई शांताबाई काळे या उघड्यावर आल्या. सध्या “कुणी घर देता का घर” म्हणत त्या सरकारी उंबरटे झीजवत असताना पाहायला मिळाल्या. याबाबत माध्यमातून बातम्या छापून आल्या, प्रशासनाने त्याची दखल घेतली.
बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या कार्यालयात दुपारी तीनच्या दरम्यान शांताबाई काळे आल्या. ठोंबरे यांनी त्यांना आज बोलून घेतले तेव्हा शांताबाई यांनी माझ्या घराचे काय झाले साहेब? असा प्रश्न केला ठोंबरे यांनी तातडीने हा विषय सामाजिक न्याय विभागाकडे असल्याने सहाय्यक आयुक्त नागेश चौगुले यांना फोन केला.
तिकडून चौगुले यांनी सर त्यांचा निधी पंचायत समितीकडे वर्ग केल्याचे सांगितले. तेव्हा ठोंबरे यांनी पुढील फोन करमाळ्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना लावला सविस्तर माहिती घेतली निधी आलेला आहे त्यांनी घरकुल बांधायला सुरू केले की वर्ग केला जाईल अशी माहिती बिडिओ यांनी दिली. हा फोन संपल्यानंतर ठोंबरे यांनी शांताबाई काळे यांना “तुम्ही घराचे बांधकाम सुरू करा निधी तुम्हाला मिळून जाईल” “आई काय मदत लागली तर नक्की सांगा”. असे म्हणताच त्या माऊलीच्या चेहऱ्यावर आनंदाची झालर पाहायला मिळाली.
त्या इतक्या भावूक झाल्या की, “साहेब पुढच्या वेळेस येताना मी काहीतरी तुमच्यासाठी गोड आणेन” तेव्हा ठोंबरे यांनी “काही गोड आणू नका तुमचे घर बांधा तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की भेट द्यायला येऊ” असे सांगितले. माझा आशीर्वाद तुम्हाला लागेल साहेब असे म्हणून त्या आनंदाने निघून गेल्या.



















