सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत घरकुल योजनेत होत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी लक्ष वेधण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या टेरेसवर चढून आंदोलन करण्यात आले. भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही तोपर्यंत खाली येणार नाही अन्यथा उडी मारून आत्महत्या करेल असा इशारा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाबाराजे कोळेकर यांनी दिला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये दुपारी अडीचच्या सुमारास अचानक जनहित शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते जिल्हा परिषदेच्या टेरेसवर चढले त्या ठिकाणी आपला फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
घरकुल योजनांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, गायरान जमिनीमध्ये झालेला भ्रष्टाचार याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कोळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली. या आंदोलनाची माहिती मिळताच सदर बजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्षीरसागर हे जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले त्यांनी तातडीने टेरेसवर जाऊन संबंधित कार्यकर्त्याना खाली आणले. आंदोलन हे लोकशाही पद्धतीने नाही या भूमिकेतून पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे रवाना केले.




















