सोलापूर झेडपीत एक तासाचे वॉकआऊट आंदोलन ; कर्मचारी महासंघाने वेधले लक्ष
सोलापूर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेमध्ये 16 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते अकरा या एका तासात वॉक आऊट आंदोलन करण्यात येऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेच्या आवारात फेरी मारली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
या आंदोलनात लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश गोडसे, कर्मचारी महासंघाचे विभागीय सहसचिव दिनेश बनसोडे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मायनाळ कंत्राटी कर्मचारी महासंघाचे सचिन जाधव, गिरीश जाधव यांच्यासह महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
केद्र शासनाच्या कर्मचारी अन्यायकारक धोरणांबाबत केंद्रीय स्तरावर एक दिवसांचा संप घोषित केलेला आहे. त्यास अनुसरुन सदर संपास पाठिंबा देण्याचा निर्णय जि.प.कर्मचारी संघटनांनी घेतला. तसेच सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे, आठवा वेतन आयोग लागू करणे व थकीत 18 महिन्यांच्या महागाई भत्त्यांची रक्कम (कोरोना कालावधीतील) अदा करणे इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन झाले.