सोलापूर झेडपीच्या या सेवानिवृत्त लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल ; झेडपीचा शिक्षण विभाग म्हणजे ‘वेड्यांचा बाजार’
सोलापूर : शहर जिल्ह्यातील विनाअनुदानित खाजगी प्राथमिक शाळांच्या 20 टक्के टप्पा अनुदानाच्या अभिलेख व रजिस्टर गहाळ प्रकरणी जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त वरिष्ठ सहायकाच्या विरोधात सदर बजार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार तत्कालीन वरिष्ठ सहाय्यक दयानंद एस कन्ना याच्या विरोधात महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 च्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
संजय जावीर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 यादरम्यान संजय जावीर हे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून अतिरिक्त कारभार पाहत होते. फेब्रुवारी 2023 पासून विनाअनुदानित खाजगी प्राथमिक शाळांना टप्पा अनुदान देण्याचा शासन निर्णय निर्गमित झाला. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 20 टक्के अनुदान प्राप्त शाळेची यादी शिक्षण संचालक यांनी जाहीर केल्यानुसार संबंधित शाळेतील २० टक्के टप्पा अनुदान प्राप्त शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता पडताळणी करण्यासाठी जिल्हा परिषद अभिलेख कक्ष व पंडित जवाहरलाल नेहरू वसतिगृह या ठिकाणी नेमलेल्या समितीमार्फत अभिलेख व रजिस्टर यांचा शोध घेतला असता सन 2012 -2013 2013 ते 2014 या कालावधीतील वैयक्तिक नसत्या कार्य विवरण नोंदवही व सन 2012 चे आवक रजिस्टर इत्यादी अभिलेखे हे मिळून आले नाहीत.
या कालावधीमध्ये कामकाज पाहणारे संबंधित लिपिक निलेश कुलकर्णी वरिष्ठ सहाय्यक यांच्याकडे लेखी विचारणा केली असता त्यांचा खुलासा व पदभार यादीमध्ये अभिलेख व रजिस्टर हे कनिष्ठ सहाय्यक निलोफर दामटे यांच्याकडे दिल्याचे दिसून आले. निलोफर दामटे यांचा लेखी खुलासा व पदभार यादी पाहिले असता त्यांनी त्याचा पदभार यादीमध्ये संबंधित रजिस्टर व अभिलेखे हे संतोष जाधव वरिष्ठ सहाय्यक यांच्याकडे दिल्याचे दिसून आले. जाधव यांनी हा पदभार यादीसह सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक दयानंद कन्ना यांच्याकडे दिला होता.
दरम्यान कन्ना यांनी त्यांच्याकडे असणारा पदभार हा पूर्णपणे तजमूल मुत्त्वल्ली यांच्याकडे दिला नसल्याचे लेखी खुलासा मुतवल्ली यांनी सादर केला. कन्ना यांच्याकडे लेखी वारंवार विचारणा केली असता त्यांनी त्यांचे लेखी खुलासे सादर केले परंतु नमूद रजिस्टर व अभिलेखे उपलब्ध करून दिले नाहीत असे स्पष्ट झाले.
त्यामुळे दयानंद कन्ना यांनी त्यांच्या कालावधीत जवाहरलाल नेहरू वस्तीगृह पार्क चौक येथे ठेवण्यात आलेले शासकीय अभिलेख व रजिस्टर हे जतन करून ठेवून कार्यभार सांभाळणे त्यांचे नैतिक कर्तव्य व जबाबदारी असताना देखील त्यांनी जाणीवपूर्वक व निष्काळजीपणा करून अभिलेख नष्ट केला अथवा गहाळ केला अथवा हरवला असल्याने त्यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार परीट व सहायक फौजदार जाधव हे करीत आहेत.