सोलापूर ( दि. ८ ) न्यायाची चाड व अन्यायाची चीड हे ब्रीद घेऊन चांद्या पासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हाध्यक्षपदी मरवडे गावचे सुपुत्र तथा छत्रपती परिवाराचे संस्थापक शिक्षक नेते सुरेश पवार यांची निवड करण्यात आली असून जिल्हा सरचिटणीसपदाची धुरा शरद रुपनवर ( माळशिरस ) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेचे अधिवेशन पंढरपूर येथील संस्कार मंगल कार्यालयात संपन्न झाले. दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विषय नियामक सभा संपन्न झाली . यामध्ये जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील शाखा पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत नविन पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. तर दुसऱ्या दिवशी खुले अधिवेशन संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी शिक्षक समितीचा गौरवशाली इतिहास अधोरेखीत करतानाच राज्य स्तरावर पाठपुरावा सुरु असलेल्या विविध प्रश्नांची उकल त्यांनी मनोगतातून केली . तर राज्य संपर्क प्रमुख किसन बिरादार यांनी अशैक्षणिक कामे, जुनी पेन्शन लढा, नवभारत साक्षरता सर्वेक्षण, शिक्षक भरती, बदल्यांचे धोरण अशा विविध प्रश्नांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी अनिल कादे हे होते . यावेळी व्यासपीठावर राज्य उपाध्यक्ष राजन सावंत , संपर्कप्रमुख किसन बिरादार, प्रसिद्धीप्रमुख डाॕ. रंगनाथ काकडे, राज्य संघटक प्रताप काळे, राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल बंडगर, विभागीय उपाध्यक्ष मो.बा.शेख, अमोघसिद्ध कोळी, मनोहर कलुबर्मे, सूकाणू समिती सदस्य विकास उकीरडे, भारत कुलकर्णी, दयानंद कवडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योती कलुबर्मे, सुरेखा इंगळे, चंद्रकला खंदारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
शनिवारी झालेल्या विषय नियामक सभेत नूतन जिल्हा पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या . यामध्ये सुरेश पवार ( जिल्हाध्यक्ष ) , शरद रुपनवर (सरचिटणीस ) , संतोष हुमनाबादकर (जिल्हा नेता ) सुनिल कोरे ( कार्यकारी अध्यक्ष ) , किशोर बगाडे , अमोल राऊत ( जिल्हा उपाध्यक्ष ) गजानन लिगाडे ( संघटक ) , दिनकर शिंदे (विभागीय अध्यक्ष ) या पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या .
यावेळी प्रास्ताविक सुनिल कोरे यांनी केले . यावेळी अनिल कादे, बाबा लाड, डाॕ.रंगनाथ काकडे, ज्योती कलुबर्मे, अमोघसिद्ध कोळी, किसन बिरादार यांनी संघटनात्मक बाबी व शिक्षकांच्या प्रश्नांवर उहापोह केला . तर नूतन पदाधिकारी सुरेश पवार, शरद रुपनवर यांनी मनोगतातून तन -मन – धनाने शिक्षकांच्या प्रश्नांसाठी झोकून देऊन काम करण्याची ग्वाही दिली . सूत्रसंचलन सुनिल अडगळे यांनी केले तर आभार शरद गावडे यांनी मानले . पंढरपूर शाखेच्या वतीने पोपट कापसे, अर्चना कोळी यांचेसह सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी मान्यवरांचे स्वागत केले व अधिवेशन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले . यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते व शिक्षक बांधव मोठया संख्येने उपस्थित होते .