सोलापूर : जिल्हा प्रशासनाच्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचा अखेर लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कार्यालय या नूतन कार्यालयात शिफ्ट होत आहेत. त्यापैकी सर्वात प्रथम अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या इमारतीमध्ये स्थलांतरित झाले त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी, महसूल उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी, ग्रामपंचायत निवडणूक विभाग ही कार्यालय आता शिफ्ट झाली आहेत.
उद्घाटनानंतर मात्र या कार्यालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले. कार्यालयाला पाण्याचे नियोजन नसल्याने या कार्यालयातील स्वच्छतागृहात सुद्धा अस्वच्छता दिसून आली. पार्किंग भागामध्ये कचरा तसेच पडलेला दिसत होता. जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी तातडीने स्वच्छतेचे काम करीत असलेल्या काही कंपन्यांशी तातडीने संपर्क साधून लवकरात लवकर कार्यालय स्वच्छतेचे नियोजन करण्याच्या सूचना केल्याची माहिती मिळाली.
कार्यालयात मुख्य प्रश्न आहे तो पाण्याचा, त्यासाठी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना बोलावून जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी बैठक घेऊन या कार्यालयाला लवकरात लवकर नळ कनेक्शन जोडावे अशा सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर सोलर सिस्टीम बसवले असतानाही अद्याप ती कार्यान्वित झाली नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. एका दुपारी अचानक लाईट गेल्याने ठोंबरे यांना बराच वेळ सर्व खिडक्या उघड्या ठेवून बसावे लागले होते, एकूणच नूतन जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक सुविधांचा अभाव पाहायला मिळतो.



















