चर्चेचा विषय असणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची वादग्रस्त चिमणी अखेर पाडण्यात आली. तेव्हापासून सिद्धेश्वर कारखाना परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. धर्मराज काडादी यांनी चिमणी पाडण्याला भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप केला होता.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावतीने लाभार्थी संमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य, आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम चालू असताना सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्याच्या निषेधार्थ कुंभारी ग्रामपंचायत समोर युवा काँग्रेसचे रोहित बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला. या आंदोलन करता कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतले.


















