सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलावर सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्याकडे तब्बल पाच कोटी 85 लाखाची बेनामी मालमत्ता म्हणून तपासात आढळून आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी ही फिर्याद दाखल केली आहे.
किरण अनंत लोहार, वय 50 वर्ष, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, पत्नी सुजाता किरण लोहार, वय 44 वर्ष, मुलगा निखिल किरण लोहार, वय 25 वर्ष सर्व राहणार प्लॉट नं. सी. 2, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी असताना किरण लोहार यांना लाज स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली. लोकसेवक किरण लोहार, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, सोलापूर यांनी लोकसेवक या नात्याने कर्तव्य करीत असताना परिक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची अशी 5,85,85,623.8/- रू. किमतीची अपसंपदा संपादित केल्याचे व त्यांची पत्नी नामे सुजाता किरण लोहार व मुलगा निखिल किरण लोहार यांनी लोकसेवक किरण लोहार यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केले असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.