सोलापूर- पद्मशाली शिक्षण संस्था संचलित , भू म पुल्ली कन्या प्रशालेच्या वतीने अभिनव असे पहिले ऑनलाइन वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
संस्थेचे सचिव दशरथ गोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यगुरु मनिषा जोशी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होत्या.
मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी शिक्षणासोबत विद्यार्थिनींच्या कला गुणांना वाव मिळावा, मुलींच्या मनातली कोरोनाची भिती दूर होऊन सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा या हेतूने हा कार्यक्रम आयोजल्याचे प्रतिपादन आपल्या प्रास्ताविकात केले.
एकपात्री अभिनय , नृत्य , गायन , वाद्य वादन , काव्यवाचन , अभिवाचन असे अनेक कलाविष्कार मुलींनी तन्मयतेने सादर केले. ऋतुजा शहापुरकर या विद्यार्थिनीने चला कोरोनाला हरवू या या एकपात्री प्रयोगातून लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर न पडता सुरक्षित राहून छंद जोपासावे हा संदेश दिला. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थिनींना शिक्षकांनी ऑनलाइन मार्गदर्शनाने तयारी करून घेतली. प्रशांत देशपांडे , उमा कोटा , अश्विनी दास यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. आशिष मिसाळ व अश्विनी मैसूर यांनी तांत्रिक सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपमुख्याध्यापक युवराज मेटे व पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी परिश्रम घेतले.
फेसबुकवर तसेच यु ट्यूब वर लाईव्ह पाहण्याचा आनंद असंख्य प्रेक्षकांनी लुटला . यावेळी कौतुकाच्या कमेंट्सचा वर्षाव झाला.



















