सोलापूर | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने योद्धा@80 अजूनही चालतोय वाट या विषयावर माहितीपट व लघुपट स्पर्धा आयोजित केली होती, त्यात वडाळ्यातील संदेश पंडित अडगळे यांनी मराठवाडा नामविस्तार या विषयात लघुपट सादर केला त्याला महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट प्रथम पारितोषिक मिळाले, ते पारितोषिक अडगळे यांना ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या हस्ते देण्याचे नियोजन होते, मात्र तो योग आला नाही,
शेवटी ते शुक्रवारी पालकमंत्री भरणे मामाच्या हस्ते देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दिनेश शिंदे हे दुपारी साडेबारा पासून नियोजन भवनात येऊन थांबले, त्यानंतर जिल्हाध्यक्ष काका साठे सुध्दा आले, काका आत न जाता बाहेर थांबले, पोलिसांनी त्यांना थोडे बाजूला सरकायला सांगितले, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला पालकमंत्री काही आलेच नाहीत, शेवटी वैतागून जिल्हाध्यक्ष काका पालकमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करून निघून गेले, शेवटी ते पारितोषिक संदेश अडगळे याला बळीराम काका साठे यांनी जिल्हा परिषदेमध्ये आपल्या विरोधी पक्षनेता कार्यालयात दिनेश शिंदे, मनोज साठे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
खरे तर हे पारितोषिक भरणे मामांच्या हस्ते द्यायचे होते याची पूर्वकल्पना त्यांना दिली होती का? हे समजू शकले नाही, जिल्ह्यात नियोजन समिती कडून निधी वाटपाच्या विषयावरून पालकमंत्र्यांवरची जिल्ह्यातून नाराजी कायम आहे. पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत जरी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी थेट साहेबांशी संबंध असलेल्या नेत्यांना ‘भरणे मामा’ अजूनही आपले वाटत नाहीत, हे तितकेच खरे आहे.



















