अक्कलकोट तालुक्यातील भासले गाव रोड येथील नूरुद्दिन बाबा दर्गा च्या पाठीमागील मैदानामध्ये शनिवारी सकाळच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली, याची माहिती अक्कलकोट उत्तर पोलिसांना देण्यात आली,माहिती मिळताच घटनास्थळी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्यासह इतर पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले
मृतदेह पाहिल्यावर मयताच्या चेहऱ्यावर गंभीर इजा दिसून येत होत्या एकंदरीत सदर इसमाला दगडाने ठेचून मारले असल्याचा अंदाज येत होता मृतदेहाची ओळख पटली नाही मात्र त्याचवेळी एक इसम तिथे आला आणि तो मयताचा भाऊ निघाला नंतर खून झालेल्या इसमाची ओळख पटली. खून झालेल्या इसमाचे नाव हे महेश मडीखांबे वय वर्षे 40 असे असून तो राहायला अक्कलकोट तालुक्यातील भीमनगर येथे आहे. त्यानंतर लगेच पोलिसांची सूत्र फिरू लागली खून कोणी केला? काय कारण असेल?आरोपीच्या शोधासाठी अक्कलकोट उत्तर पोलिस माहिती घेऊ लागले.
पोलिसांना समजले की, मयत महेश हा नेहमीप्रमाणे आपल्या घराबाहेर सायंकाळच्या सुमारास उभा होता त्याचे इतर दोन मित्र हे त्या ठिकाणी आले आणि त्याला चल पार्टी करूया असे म्हणून भीमनगर येथील घराजवळून घेऊन गेले ते महेश परत आलाच नाही, दुसऱ्या दिवशी त्याचा खून झाल्याचं समजलं . दारू पिण्यास गेल्यानंतर महेश मडीखांबे याची त्या दोन मित्रांमध्ये बाचाबाची झाली, बाचाबाचीचे रूपांतर शिवीगाळ पर्यंत पोहोचले आणि शिवीगाळचे रूपांतर हाणामारीत झाले आणि हाणामारीचे रूपांतर थेट खुनामध्ये झाले. असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या खून प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी हे पुढील तपास करत आहेत.

















