सोलापूर शहरातील खड्डे हे तर आता जगप्रसिद्ध झाले आहेत, असा कोणता रस्ता शहरात नसेल त्या रस्त्यावर खड्डे नसतील, सोलापूर शहरात प्रवेश करण्यासाठी अनेक मार्ग आहेत, सर्वच्या सर्व मार्गावर खड्डे आहेत, दरवर्षी मोठा पाऊस पडला की तात्पुरता मुलामा केलेली डांबर आणि खडी निघून जाते, पुन्हा आहे तीच परिस्थिती.
सोलापूरात तीन आमदार आहेत परंतु रस्त्यावरील खड्ड्याबाबत कुणालाच गांभीर्य नाही. विकासाचे व्हिजन नाही, लोकप्रतिनिधी केवळ वैयक्तिक संबंध जोपासण्यात मग्न असतात. सोलापूरची ओळख आता खड्डेपूर झाली आहे. सोलापूर शहरातील रस्त्यांची दुर्दशा पाहता सार्वजनिक बांधकाम विभाग करतंय काय?हाच प्रश्न सामान्य माणसाला पडतो, आता तर या खड्ड्यांची थट्टा होऊ लागली आहे, सोशल मीडियावर एक चित्र व्हायरल केलं जातं आहे, त्यामध्ये शोले चित्रपटातील अमिताभ बच्चन व धर्मेंद्र हे दोन अभिनेते दाखवण्यात आले आहेत, अमिताभ बच्चन हे जखमी झाले असून धर्मेंद्र त्यांना विचारतात, “कैसे हुवा, तर बच्चन म्हणतात सोलापूर गया था”…त्याखाली सोलापूर शहरातील रस्त्यावरील खड्डे दाखवण्यात आले आहेत.
सोलापूर शहरात सात रस्त्यावरून होटगीला जाणारा मार्ग हा व्हीआयपी रोड म्हणून ओळखला जातो मात्र या रोडची अवस्था अतिशय वाईट असून रस्त्यावरील डांबर उडून गेली आहे, मोठमोठे खड्डे पडले आहेत, विशेष म्हणजे या रस्त्याला लागून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यालय आहे तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी या रस्त्यावरून ये-जा करतात, महापालिकेच्या महापौर सुद्धा याच रस्त्याचा वापर घरी जाण्यासाठी करतात, शहरातील दोन आमदार सुद्धा याच रस्त्यावरून ये-जा करतात तरीही या रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल.


















