सोलापूर : शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा महापालिकेचे नगरसेवक गणेश वानकर हे शुक्रवारी दुपारी दोन सहकार्यांसोबत तावातावात जिल्हा परिषदेमध्ये आले. त्यांनी सर्वात प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यालयात जाऊन चर्चा केली लगेच दहा मिनिटात बाहेर येऊन ते शिक्षण विभागात गेले त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची भेट घेतली त्यानंतर ते बाहेर पडले.
दरम्यान एवढ्या गडबडीत झेडपी मध्ये गणेश वानकर हे का आले याची माहिती घेतली असता समजले की, सोलापूर सांगली दरम्यान होत असलेल्या महामार्गावर देगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा बराचसा भाग गेलेला आहे, यामध्ये शाळेची संरक्षक भिंत, मुलींचे शौचालय त्याचबरोबर प्रशालेच्या समारंभ सभागृहाची समोरची बाजू या महामार्गाच्या भूसंपादन मध्ये गेली आहे.
4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होत आहेत त्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या शाळेचे चित्र पाहून विद्यार्थी कसे येणार? त्याची दुरूस्ती कोण करणार? हे प्रश्न घेऊन वानकर मुख्याध्यापक सोबत जिल्हा परिषदेमध्ये आले होते, तेव्हा सीईओ स्वामी यांनी हा विषय शिक्षण अधिकाऱ्याचा असल्याने त्यांच्याकडे पाठवले होते मुळात जिल्हा परिषदेच्या शाळेची संरक्षक भिंत, जागा, सभागृहाचा भाग, शौचालय हे रस्त्यात गेल्याने प्रांत अधिकाऱ्याकडून जिल्हा परिषदेला याची कोणतीही माहिती दिली गेली नसल्याचे समोर आले,
त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून शाळेला कोणताही दुरुस्तीसाठी निधी आलेला नसल्याची माहिती वानकर यांना मिळाली. देगावची जिल्हा परिषद शाळा मोठी आहे, मुलांची आणि मुलींची स्वतंत्र शाळा आहे, बरेच विद्यार्थी शिक्षण घेतात अशा वेळी जिल्हा परिषदेच्या शाळेची जागा जाते, रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून प्रांतअधिकाऱ्याकडून जिल्हा परिषदेला तशी कोणतीही माहिती नाही एकूणच जिल्हा परिषदेचा किती सावळागोंधळ आहे यावर वानकर यांनी तीव्र नाराजी आणि कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

















