सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 15 सप्टेंबर 2021 रोजी दिव्यांग, अस्थिव्यंग व इतर अशा 200 उपशिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती करून समुपदेशन पध्दतीने पदस्थापना देण्यात आली. यामध्ये एकुण 56 दिव्यांग शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला. या पदोन्नतीची ऑर्डर जिल्हा परिषद प्रशासन 29 सप्टेंबर रोजी देणार होते,
मात्र एका उपशिक्षकाने या पदोन्नतीच्या विरोधात आपल्यावर अन्याय झाला म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर 30 सप्टेंबर 2021 पर्यंत उच्च न्यायालयाने स्टे दिला होता, याची सुनावणी एक ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली होती. 30 सप्टेंबर रोजी पदोन्नती मिळाल्यानंतर यातील काही मुख्याध्यापक रिटायर होणार होते त्यामुळे शिक्षक संघटना आणि या पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले.
मात्र 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर हे न्यायालयात सर्व रेकॉर्ड घेऊन हजर झाले एकूणच सर्व कागदपत्रे आणि रेकॉर्ड पाहता प्रमोशनची यादी प्रसिद्ध केल्यानंतर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या मात्र त्या शिक्षकाने वेळेत आपली हरकत दाखल केली नाही. त्यामुळे न्यायालयाने जिल्हा परिषद प्रशासनाच्या बाजूने निकाल दिला.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने एडवोकेट किल्लेदार यांनी काम पाहिले. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शिक्षकांना 28 सप्टेंबर रोजीची पदोन्नती ऑर्डर देण्यात येणार आहे. उपशिक्षक क्षीरसागर यांनाही न्याय मिळेल, प्रमोशन झालेल्यापैकी काही मुख्याध्यापक रिटायर्ड झाल्याने जागा शिल्लक असून ते कायदेशीर दृष्ट्या सेवाज्येष्ठतेत बसत असतील तर त्यांचे ही प्रमोशन होईल.

















