सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांची भली मोठी रांग दिसून आली. १६० जणाचे १८८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून या अर्जाची छाननी 3 डिसेंबर रोजी कारखाना जवळील काडादी सभागृहात होणार आहे.
सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 20 जागांसाठी 26 नोव्हेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. दोन डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता शेवटच्या दिवशी शेतकरी सभासदांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मोठी गर्दी केली होती. विद्यमान चेअरमन धर्मराज काडादी त्यांचे विरोधक सिद्रामप्पा अब्दुलपुरकर या प्रमुखांसह सुमारे 188 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे, दक्षिण चे माजी सभापती भीमाशंकर जमादार, दक्षिणचे काँग्रेस तालुकाध्यक्ष हरीश पाटील ही नेते मंडळी दिवसभर ठाण मांडून होती.
दरम्यान विक्रमी अर्ज दाखल झाल्याने या अर्जाची शुक्रवारी अकरा वाजता सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या शेजारी असलेल्या अप्पासाहेब काडादी सभागृह या ठिकाणी अर्जाची छाननी करण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी घेतला आहे.
अर्जाच्या छाननीनंतर सहा ते दहा डिसेंबर कालावधीत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. अर्ज माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार असून निवडणूक लागल्यास 25 डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे.
दरम्यान कारखान्यावर आजतागायत धर्मराज काडादी यांचे सत्ता कायम आहे यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज विक्रमी दाखल झाल्याने बिनविरोध होईल की निवडणूक लागेल याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

















