सोलापूर : (गुरुशांत मोकाशी) श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय(सिव्हील हॉस्पिटल) गोरगरिबांसाठी आरोग्य दायिनी आहे. केवळ सोलापूर शहर जिल्ह्याच नाहीतर विजापूर, गुलबर्गा, उस्मानाबाद, लातूर, सांगली या भागातून सोलापूरच्या सिव्हीलमध्ये उपचारासाठी रुग्ण येतात. एवढे मोठे हॉस्पिटल असताना आरोग्य विभागाचा मोठ्या प्रमाणात निधी येतो. एक्स-रे, सिटीस्कॅन, एमआरआय या सर्व चाचण्या खाजगीमध्ये महागडया आहेत.
किमान दोन हजाराच्या वर असलेल्या या चाचण्या आहेत असे असताना गोरगरीब, सर्वसामान्य, कामगार, कष्टकरी रुग्णांना खासगी मध्ये हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे सिविल हॉस्पिटल कडे नागरिकांचा ओढा असतो असे असताना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन मशिन मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांना नाहक त्रास आणि खर्चाचा भुर्दंड पडत आहे. पैशाअभावी दुरुस्ती होत नसल्याची माहिती समोर आली आहे.कायमच रुग्ण सेवेच्या वेशभूषेत फिरणाऱ्या अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची माहिती समोर आली आहे.
सिव्हील हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवक म्हणून अनेक जण मिरवत असतात, आपली अपेक्षित कामे करून घेतात, काहीजण मनापासून नित्य नियमितपणे काम करतात, काहीजण प्रसिद्धी साठी सिव्हीलमध्ये दिसतात मात्र अशा प्रश्नांकडे त्यांचं लक्ष नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहर मध्य च्या आमदार प्रणिती शिंदे हे या प्रश्नाकडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.


















