सोलापूर : शहर पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्तपदाच्या अधिकाऱ्यांच्या आयुक्तालयांतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलिस आयुक्त हरिश बैजल यांनी दिले आहेत. विभाग दोनच्या सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांची शहर गुन्हे शाखेकडे बदली करण्यात आली आहे.
शहर पोलिस आयुक्तालयामध्ये सात सहायक पोलिस आयुक्तांची पदे आहेत. ही पदे गेल्या अनेक महिन्यांपासून भरली नव्हती. त्यामुळे एकेका अधिकाऱ्याकडे अतिरिक्त पदभार होता. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील सहायक आयुक्तपदाच्या अधिकाऱ्यांच्या गृह विभागाने बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये शहर पोलिस आयुक्तालयामध्ये पाच
अधिकारी बदलून आले आहेत. या सर्व व पूर्वीच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलिस आयुक्त बैजल यांनी दिले आहेत.
नियुक्ती दिलेले अधिकारी पुढीलप्रमाणे (कंसात पूर्वीचे ठिकाण व बदलीचे ठिकाण) : – डॉ. प्रीती टिपरे (विभाग दोन येथून गुन्हे शाखा), दीपक आर्वे (विशेष शाखा येथून शहर वाहतूक शाखा), डॉ. संतोष गायकवाड (नव्याने हजर ते विभाग १), माधव रेड्डी (विभाग १ येथून विभाग २), प्रांजली सोनवणे ( प्रशासन येथून प्रशासन), अनिल लंभाते (शहर वाहतूक शाखा ते विशेष शाखा), अजय परमार (नियत्रंण कक्ष ते नियंत्रण कक्ष).
















