सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग क्रमांक एक चे कार्यकारी अभियंता पी डी कदम यांच्या यांच्या कार्यपद्धतीवर मागच्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी सदस्य यांच्यामध्ये प्रचंड नाराजी ऐकण्यास मिळाली. सोमवार 13 डिसेंबर रोजी झालेल्या बांधकाम समितीच्या सभेमध्ये कार्यकारी अभियंता कदम यांच्यावर सभापती विजयराज डोंगरे व इतर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कदम यांना शासनाकडे परत पाठवण्याचा ठराव करण्याची भूमिका व्यक्त केली होती.
मात्र कामकाजात सुधारणा करण्यासाठी चार दिवसाची मुदत देण्यात आली तसेच हा विषय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या कानावर गेला त्यांच्याशीही चर्चा झाल्यानंतर त्यांनीही काही दिवस थांबावे अशी विनंती पदाधिकाऱ्यांना केली. परंतु आठवडाभरानंतर ही कदम यांच्या कामकाजात कोणतीही सुधारणा झाली नाही शेवटी सोमवारी सभापती विजयराज डोंगरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली व त्यांना पत्र दिले.
यावेळी वसंत नाना देशमुख, भारत आबा शिंदे, बाळासाहेब देशमुख, आनंद तानवडे यांची उपस्थिती होती. कदम यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, त्यांच्या कामात अनेक चूका आहेत, बांधकाम विभागाचे तीन वर्षाचे प्रोसिडिंग नाही, मग कसा कारभार चालणार, कोणतीही कामे वेळेवर होत नाहीत, पदभार कुणालाही द्या, अशी मागणी केली.
कार्यकारी अभियंता कदम यांचे केवळ 5 महिने निवृत्तीला राहिले आहेत. त्यातच अनेक विभागाचे पदभार प्रभारी आहेत, अशात आता प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

















