नव्या वर्षात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. शनिवारी रात्री देशाला संबोधित करताना त्यांनी यासंदर्भात घोषणा केली.
जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं.
शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांची, पालकांची चिंता कमी होण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
भारताने आतापर्यंत 141 कोटी लशीचे डोस दिलेत. घाबरून जाऊ नका, मास्क परिधान करा, नियम पाळा”, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
लसीकरण हे कोरोना लढाईतलं मोठं अस्त्र आहे. 18 लाख आयसोलेशन बेड्स आहेत. 5 लाख ऑक्सिजन पुरवठा असलेले बेड्स आहेत. आयसीयू आणि नॉन आयसीयू मिळून लहान मुलांसाठीही स्वतंत्र बेड्स आहेत”, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
“देशात 3000 हून अधिक ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत”, असं त्यांनी पुढे सांगितलं.
देशातील आरोग्य सेवकांना आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस 10 जानेवारी 2022 पासून देण्यात येईल. सहव्याधी असलेल्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्यात येईल. लवकरच नाकावाटे लस तसंच डीएनए लसही लवकरच उपलब्ध होईल असं पंतप्रधान म्हणाले
देशात आतापर्यंत कोरोना लशीचे 141 कोटी डोस देण्यात आल्याची माहिती यावेळी नरेंद्र मोदी यांनी दिली.

















