पंढरपूर : सूनेला मूल होत नसल्याचेनिमित्त करुन संबंध ठेवण्यासाठी तिचे अंघोळ करतानाचे व्हीडीओ काढून सूनेला ब्लॅकमेल केल्याच्या कारणावरुन पंढरपूर तालुक्यातील एकजणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन संबंधित आरोपीस ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आरोपीच्या सूनेला मूल होत नव्हते.
दोन आठवड्यापूर्वी आरोपीने स्वतःच्या सूनेच्या अंगावर हात टाकून तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पिडीत महिलेने आरडाओरड केल्याने आरोपी सासऱ्याने तिला सोडून दिले. घडलेल्या प्रकाराविषयी पिडीत महिलेने पतीस सांगितले होते. परंतु त्यावेळी पिडीतेची समजूत घातली गेली होती. दरम्यान, 20 डिसेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास पिडीत महिला घराच्यासमोर असलेल्या बाथरुममध्ये अंघोळीस गेली होती. तेव्हा आरोपीने पिडीत महिलेच्या न कळत मोबाईलमध्ये शुटींग काढले. त्यानंतर आरोपीने शूटींग पिडीत महिलेस दाखवून तुला माझ्या मुलापासून मुलबाळ होणार नाही.
तू माझ्याशी संबंध ठेवले नाही तर मी तुझे अंघोळ करतानाचे शुटींग पुढे पाठवीन, असे म्हणून ब्लॅकमेल केले. त्यावेळी पिडीत महिलेने फोन करण्याच्या कारणाने मोबाईल घेतला आणि आरोपी सासऱ्याची नजर चुकवून पिडीतेने शुटींग पाहून खात्री करून घेऊन तो आपल्या भावाच्या मोबाईल वर पाठवला. आरोपीने पिडीत महिलेस हे शुटींग वारंवार दाखवून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. पिडीत महिला माहेरी गेली आणि तिने तिच्या आई-वडिलांना हा प्रकार सांगून आज पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन त्यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्चे हे पुढील तपास करीत आहेत.

















