सोलापूर : सोलापूर जिल्हा अजूनही काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याच नावाने देशभरात ओळखला जातो. दोनवेळा त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. तेव्हापासून त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण जास्त लक्ष घालणे बंद केले. त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचा मात्र नंतर शहराच्या राजकारणात दबदबा वाढला. सध्या काँग्रेस पक्षात ताईंचे वर्चस्व आहे. परंतू, त्यांच्या स्वभावावर कायम नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळेच सुधीर खरटमल, ऍड बेरिया, नलिनी चंदेले यांनी पक्ष सोडला. मधल्या काळात पक्षात कटकारस्थान बरीच झाली, यामध्ये सुशीलकुमार शिंदे साहेब लक्ष का घालत नाहीत असा प्रश्न काँग्रेसच्या अनेक निष्ठावंतांना पडला होता.
अशातच महेश कोठे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिकेत सत्तेचे स्वप्न दाखवले आहे. हेच स्वप्न कोठे यांनी 2017 मध्ये शिवसेनेला ही दाखवले होते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हे स्वप्न पूर्ण करण्याची वैयक्तिक ताकद कोठे यांच्यात नाही, आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सोलापूर शहरातील परिस्थिती पाहता ते शक्य नव्हते म्हणून कोठे काँग्रेस नेत्यांना फोडून त्यांच्या हातात घड्याळ बांधत आहेत.
या एकूणच सर्व राजकिय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेस भवन मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शिंदे यांनी पक्षातील फुटीर आणि काड्या करणाऱ्यांना चांगलेच सुनावले, यावेळी बऱ्याच दिवसांनी काँग्रेस भवनात शिंदे साहेबांच्या नावाचा जयघोष झाला, हा जयघोष दिखाऊ नव्हता तर तो कार्यकर्त्यांचा मनापासून आलेला होता.
या भाषणानंतर उपस्थित पत्रकारांनी सुद्धा हाच धागा पकडून शिंदे यांना बोलत केलं. येणाऱ्या महापालिकेत त्यांनी निश्चितच लक्ष घातलं असल्याचे बोलण्यावरून जाणवले. याचवेळी प्रणितीताई ऐवजी तुम्ही महापालिकेत लक्ष घालणार का? असा प्रश्न आला असता प्रणिती शिंदे या नेता आहेत, मला आता कोण विचारतंय असे म्हणून त्यांनी आमदार प्रणिती यांचं महत्व वाढवलं.

















