सोलापूर : काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी जिल्हा काँग्रेसचे माजी प्रवक्ता बसवराज बगले यांना चांगलेच फैलावर घेतले. सोलापूरच्या पक्ष नेतृत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित केल्याने बगले यांनी आपली स्वतःची अडचण वाढवली होती.
बसवराज बगले हे शिंदे यांना भेटायला गेले असता त्यांना झाप झाप झापले. यावेळी काँग्रेस पक्षातील शहर व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस भवनात दोन दिवसांपासून याचीच चर्चा आहे.
सोमवारीच सुशीलकुमार शिंदे यांनी बगले यांच्यावर राग व्यक्त केला होता केवळ एक दिवस जात नाही ते बसवराज बगले यांनी बुधवारी लगेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये सोलापुरातील माजी महापौर महेश कोठे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांची उपस्थिती होती.
हा फोटो बाहेर पडल्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर चर्चेला ऊत आला आहे. मात्र बसवराज बगले यांच्याशी संपर्क साधून या फोटोबद्दल विचारले असता त्यांनी आज मी मुंबई मध्ये गेलो होतो, मंत्रालयात गेल्यानंतर कायमच सर्व नेत्यांच्या मी भेटीगाठी घेतो यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केल्यामुळे सर्वांचा चांगला परिचय आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे या भागात विकासकामांना निधी मिळावा म्हणून आपला राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रयत्न सुरू आहे. त्यांना भेटायला गेल्यानंतर त्याच वेळी महेश कोठे, दिलीप कोल्हे, यशवंत माने ही नेते मंडळी तिथे होती. त्यामुळे हा फोटो व्हायरल झाला आहे असे सांगतानाच शिंदे साहेबांनी जरी आपल्यावर नाराजी व्यक्त केली असली तरी ते ज्येष्ठ नेते आहेत मी त्यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी अनेक वर्षे काम केले आहे. ते मुख्यमंत्री असताना दक्षिण सोलापूर तालुक्यातून ते आमदार झाले होते तेव्हापासून त्यांचे आणि माझे संबंध आहेत. ते माझे नेते आहेत आणि राहतील.

















