सोलापूर : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. रूग्णसंख्येचा आलेख वाढू लागला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक नियम लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक दुपारी तीन वाजता सुरू होती. दुसरीकडे मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्र्यांनी रद्द केली.
याचवेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नियोजन भवनात टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त पी शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले, डॉ अनिरुद्ध पिंपळे, डॉ मिलिंद जोशी, सिव्हील हॉस्पिटलचे डॉ एच के प्रसाद, डॉ अग्रजा चिटणीस, महिला व बालकल्याण विभागाचे जावेद शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, डॉक्टर रित्विक जयकर यांच्यासह जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलिस, आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत कडक निर्बंध करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला करण्यात आल्या. मंगल कार्यालयातील गर्दी, पेट्रोल पंप तपासणी, एकाच ठिकाणी गर्दी होऊ देऊ नये, शहर जिल्ह्यातील लसीकरण, बालकांचे लसीकरण, शाळांची परिस्थिती, आरोग्य यंत्रणा, बेडची उपलब्धता, ऑक्सिजन सुविधा, कोविड केअर सेंटर सुरू करणे आणि इतर मुद्दावर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लसीकरणावर भर देण्याच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी ग्रामीण भागात काम लसीकरणाचे काम करणाऱ्या आशा सेविकांच्या कामाचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता
देशभरासह राज्यातही मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तीन-चार दिवसांनी कोरोनाची आकडेवारी डबल रेटींगने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक रूग्ण आढळणार असल्याची भीती व्यक्त केली आहे.


















