सोलापूर–अनेक वर्षापासून बंद असलेला महापौर चषक यंदाच्या वर्षी क्रिकेट लीगच्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.
सोलापूर महानगरपालिकेच्या स्टेडियम कमिटीची सभा गुरुवारी सायंकाळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती. यावेळी महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे एसडीओ हेमंत निकम ,सहायक पोलिस आयुक्त दीपक आर्वे ,सहायक आयुक्त नानासाहेब माहनवार, क्रीडा अधिकारी नजीर शेख,सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बर्सु सदस्य हाजीमलंग नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पार्क स्टेडियम या मैदानाचे काम पूर्ण झाले असून हे मैदान स्मार्ट सिटी कडून सोलापूर महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने लवकरात लवकर मैदान खुले करावी अशी मागणी यापूर्वी केली होती त्यामुळे लवकरात लवकर क्रिकेट खेळाडू साठी मैदान खुले करावे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली
पार्क स्टेडियम येथील मुख्य पीच व सराव पिच आठ ते दहा क्रिकेट सराव सामने होण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. सर्वांच्या मताने सोलापूर प्रीमियर लीग घेण्यात येणार असून त्याला महापौर चषक असे नाव देण्यात आले आहे. तसेच पार्क स्टेडियम येथे लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी एका दिवसासाठी भाडे 12000/- रुपये ठेवण्यात आले आहे. तर शनिवार व रविवारी 15000/-रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच सोलापूर शहरातील क्रिकेट क्लब सरावासाठी मासिक भाडे 15000/- रुपये ठेवण्यात आले आहे.
त्यामध्ये रोज दोन तास सकाळ किंवा सायंकाळी सराव करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे.त्याचबरोबर क्लबच्या क्रिकेट सरावासाठी खेळाडूंची संख्याही 30 ठेवण्यात आली आहे.त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूना आयकार्ड देण्यात येणार असून त्यासाठी 25 रुपये वेगळे आकारण्यात येणार आहे.दरम्यान स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पार्क मैदानाचे काम पूर्ण झाले असून सदर कामाचा दर्जा तपासण्यासाठी मैदानावर क्रिकेट मॅचेस घेण्याची सूचना करताच महापौर श्रीकांचना यन्नम यांनी अनेक वर्षापासून बंद असलेला महापौर चषक क्रिकेट लीगच्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय घेणार असल्याची घोषणा यावेळी केली.
या महापौर चषक क्रिकेट लीग या संदर्भात एक समिती गठित करून पुढचे निर्णय लवकरच घेण्यात येतील अशी माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी यावेळी दिली.पार्क मैदानावर घेण्यात येणार्या महापौर चषक क्रिकेट लिग चे नियोजन स्टेडियम कमिटीमध्ये घेण्यात आले असून यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य ते नियोजन करण्यात येईल अशी माहिती पालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी यावेळी दिली.

















