मंगळवेढा : येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक निर्मितीसाठी सरकारी जमीन वर्ग करण्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिले आहेत.त्यामुळे या कामाला आता गती मिळणारच अशी खात्री स्मारक कृती समितीचे अध्यक्ष बसवराज बगले यांनी व्यक्त केली आहे.
जगातील पहिली “लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव मंटपाची ’ स्थापना महात्मा बसवेश्वरांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे 31 वर्षे राहून केली. म्हणूनच मंगळवेढा येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक निर्मितीसाठी शासकीय जमीन हस्तांतरीत करून शंभर कोटींच्या निधीची तरतूद करावी ही लिंगायत समाजाची मागणी आहे.
लिंगायत समाजाच्या या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी वेळ घेऊन बसवराज बगले यांनी मंत्रालयात बुधवारी भेट घेतली.आणि स्मारक निर्मितीचा अभ्यासपूर्ण अहवाल मांडला. सरकारी जमीन स्वतंत्रपणे स्मारकासाठी देऊन 100 कोटींची आर्थिक तरतूद आगामी अर्थ संकल्पात करावी असे लेखी निवेदन दिले.
लिंगायत समाजाची मागणी पूर्ण होरणारच
याविषयी अतिशय आत्मियता दाखवून उपमुख्यमंत्री अजितदादांनी,लिंगायत समाजाची ही प्रलंबित मागणी मी लवकरच पूर्ण करेन,अशी हमी दिली.त्यासाठी कृषी खात्याची अथवा कृष्ण तलावाची 15 हेक्टर सरकारी जमीन लवकरच महात्मा बसवेश्वर स्मारकाला दिली जाईल.असे जाहीरही केले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्वरीत प्रस्ताव मागविण्याचे निर्देश त्यांनी बगले यांच्या निवेदनावर दिले.
मंगळवेढा येथील कृषी बीज गुणन प्रक्षेत्राची 09 हेक्टर 66 आर इतकी शेतजमीन स्वतंत्रपणे स्मारकासाठी ” वर्ग करण्यात यावा असा अहवाल मंगळवेढा प्रांताधिकारी यांनी दि.26/10/2017 च्या पत्राद्वारे दिला आहे.
कृषी खात्याची जमीन स्मारक समितीसाठी वर्ग करून त्याच्या मोबदल्यात मंगळवेढा गाव हद्दीतील कृष्ण तलावालगतची उर्वरित सरकारी जमीन कृषी विभागाला देता येईल.अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली आहे.
जमीन मिळताच निधीही देणार – पवार
या प्रक्रियेला प्रशासकीय विलंब लागल्यास अथवा तांत्रिक अडचण असल्यास कृष्ण तलावाची सरकारी जमीनच स्वतंत्रपणे महात्मा बसवेश्वर स्मारक निर्मितीसाठी वर्ग करण्याची हमी अजितदादांनी यावेळी दिली.जागा मिळताच गरजे नुसार 100 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करेन असा विश्वासही या बैठकीत त्यांनी दिला.स्थानिक पातळीवर प्रशासकीय पाठपुरावा करून लवकर प्रस्ताव आणण्याची सूचनाही त्यांनी स्मारक कृती समितीचे अध्यक्ष बसवराज बगले यांना केली.
याप्रसंगी मोहोळचे आमदार यशवंत माने,सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे,माजी उपमहापौर दिलीप कोल्हे,आणि इंदापूर बाजार समितीचे सभापती दत्तात्रय फडतरे,परिवहनचे माजी सभापती मल्लेश बडगू आदि उपस्थित होते.


















