सोलापूर : को-जनरेशनच्या बेकायदेशीर चिमणीमुळे चर्चेचा विषय झालेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी मल्टीस्टेट साखर कारखान्याच्या चेअरमनपदी यंदा धर्मराज काडादी यांनी आपले चिरंजीव पुष्कराज यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली. त्यामुळे पुष्कराज काडादी हे कारखान्याच्या चेअरमन पदावर विराजमान झाले आहेत तर व्हाईस चेअरमन म्हणून या निवडणुकीमध्ये पळापळ करून बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सिद्धाराम चाकोते यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची विशेष सभा शुक्रवारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहामध्ये पार पडली या विशेष सभेमध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीचा विषय होता.
या सभेमध्ये अध्यक्षपदासाठी पुष्कराज काडादी यांचा एकमेव अर्ज आला त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून गुरुराज माळगे आणि अनुमोदक म्हणून शिवशंकर बिराजदार यांची सही होती.
तर व्हाईस चेअरमन पदासाठी सिद्धाराम चाकोते यांचा एकमेव अर्ज होता त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून अरुण लातुरे व अनुमोदक शिवानंद पाटील यांनी सही केली. या बैठकीत पुष्कराज काडादी यांची अध्यक्ष तर सिद्धाराम चाकोते यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली.
या वेळी धर्मराज काडादी यांच्यासह गुरुराज माळगे, शिवशंकर बिराजदार, अमर पाटील, सुरेश झळकी हे सहा विद्यमान संचालक याशिवाय राजशेखर पाटील, अशोक पाटील विलासराव पाटील, अरुण लातुरे, मल्लिकार्जुन ऊर्फ प्रमोद बिराजदार, विद्यासागर मुलगे, शंकर पाटील, सिध्दाराम व्हनमाने, शिवानंद पाटील, मंगला काडादी व श्रीदेवी माशाळे यांची उपस्थिती होती.


















