सोलापूर : राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव, त्यातच नव्या ओमीक्रोन व्हेरियंटची भीती याची काळजी घेत राज्य सरकारने निर्बन्ध कडक केले आहेत. शाळा बंद केल्या, रात्रीचा कर्फ्यु लावला, कार्यालयात50 टक्के उपस्थिती, जमावबंदी, मैदाने बंद, सांस्कृतिक कार्यक्रम बंद, मेळावे,मोर्चे, राजकीय कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली.
राज्यास सोलापूर शहर व जिल्ह्यात मागील दहा दिवसांत रुग्णांची संख्या 500 च्या वर गेली आहे, अशीच रुग्ण संख्या वाढली तर परिस्थिती लॉकडाऊन कडे जाईल, मात्र जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लॉकडाऊन नको असेल तर लसीकरण करून घ्या, किमान मृत्यूचा धोका नाही असे वारंवार आवाहन केले आहे. अजूनही सोलापूर शहर जिल्ह्यात सुमारे चार लाख नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही.
एकूणच ही परिस्थिती पाहता आता कोविड सेंटर सुरू करण्याकडे कल वाढला आहे, हॉस्पिटलना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सिव्हील हॉस्पिटल मधील ऑक्सिजन प्लांटला अचानक भेट दिली,
यावेळी सिव्हीलच्या कोविड समन्वयक डॉ अग्रजा चिटणीस यांच्यासोबत प्लांटची पाहणी केली, पुढील तयारी,ऑक्सिजनची उपलब्धता याची सविस्तर माहिती घेतली. यावेळी सिव्हील हॉस्पिटल प्रशासन ऑक्सिजनच्या बाबतीत परिपूर्ण असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आले. संभाव्य कोरोना लाटेच्या अनुषंगाने कोरोना रुग्णासाठी बेडची तयारी ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले आहेत.

















