सोलापूर : राज्यामध्ये एसटी कर्मचारी संपाला जवळजवळ अडीच महिने होत आले आहेत. अजूनही संप मिटायला तयार नाही. अनेक बैठका झाल्या, चर्चा झाल्या परंतू तोडगा निघत नाही. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांच्यावर पक्षाने एसटी महामंडळ प्रशासन आणि आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधून कारवाई पूर्वी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी आवाहन करण्याची जबाबदारी दिली आहे.
त्यानुसार शनिवारी प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी शासकीय विश्रामगृहावर बैठक घेतली.
या बैठकीला सहजिल्हा संपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटिल, युवा सेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे, माजी शहर प्रमुख हरिभाऊ चौघुले, सोलापूर परिवहन विभाग नियंत्रक विलास राठोड, कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश अवस्थी, विभागीय सचिव शिवाजी काशिद, डेपो अध्यक्ष बाळासाहेब मोरे, वाहतूक नियंत्रक बाळासाहेब बिडकर, प्रविण लवटे, शहाजी घोडके, बब्रुवान भोसले, आणि कर्मचारी उपस्थित होते.
शिवाजी सावंत म्हणाले, आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई व्हावी या भूमिकेत शिवसेना नाही जे कर्मचारी निवृत्तीच्या जवळ आहेत त्यांच्यावर कारवाई झाल्यास मोठे नुकसान होणार आहे, आयुष्यभर केलेली कष्टाची कमाई मिळणार नाही. सामोपचाराने आम्ही जिल्हाभर फिरत आहोत व त्याचा सकारात्मक फायदा होताना दिसत आहे. माढा, कुर्डूवाडी, पंढरपूर, मंगळवेढा या या आगारातील बरेचसे कर्मचारी सध्या कामावर जॉईन झाले आहेत.
सोलापूर विभाग नियंत्रक विलास राठोड म्हणाले, जे कर्मचारी अद्याप कामावर हजर नाहीत त्यांनी त्वरित कामावर हजर व्हावे, त्यांच्यावर कोणतीही अपराधात्मक कारवाई होणार नाही याची हमी एसटी महामंडळ देत आहे.


















