तुळजापूर : बेशिस्त वर्तन केल्याचे सिद्ध झाल्याने तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील 11 पुजाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गाभाऱ्यात प्रवेशाला बंदी असतानाही प्रवेश करणे, गाभाऱ्यात फोटो काढणे, बेशिस्त वर्तन, सुरक्षा रक्षकांची हुज्जत घालणे, भाविकांना मंदिरात घुसवणे यासारख्या वेगवेगळ्या कारणांसाठी ही कारवाई करण्यात आली. तसेच या पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावरकर यांनी ही कारवाई केली आहे. तुळजाभवानी मंदिरात 11 पुजाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचं सिद्ध झालं आहे. गाभाऱ्यात प्रवेशाला बंदी असतानाही प्रवेश करणे, गाभाऱ्यात फोटो काढणे, बेशिस्त वर्तन, सुरक्षा रक्षकांची हुज्जत घालणे, भाविकांना मंदिरात घुसवणे यासारख्या वेगवेगळ्या कारणांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
आपल्या पदाचा दुरूपयोग करून छोट्या – मोठ्या लाभांसाठी नियम पायदळी तुडवणाऱ्या या पुजाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई केली आहे. नियमांचं उल्लंघन तुळजाभवानी मंदिरात भाविकांप्रमाणेच पुजाऱ्यांसाठीदेखील काही नियम घालून देण्यात आले आहेत.
मंदिरात गोंधळ उडू नये, कायदा सुव्यवस्था टिकून राहावी आणि सर्वांना न्याय्य पद्धतीनं दर्शनाचा लाभ मिळावा, या उद्देशानं हे नियम आखण्यात आले आहेत. कुठल्याही पुजाऱ्याला मंदिरात काम करण्यापूर्वी या नियमांची कल्पना देण्यात आलेली असते आणि त्या नियमांचं पालन पुजाऱ्यांनी करणं बंधनकारक आहे. मात्र काही पुजाऱ्यांनी या नियमांचं उल्लंघन केल्याने कारवाईचा बडगा उगारला आहे.


















