सोलापूर (प्रतिनिधी): दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोव्हीड केअर सेंटर येथे महाराष्ट्र शासन पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या चित्ररथ (आय.ई. सी. मोबाईल व्हॅन) चे उद्घाटन सोमवारी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. देशमुख यांनी कोविड लसीकरण आणि जनजागृतीसाठी मोबाईल चित्ररथ प्रभावी ठरणार असल्याचे सांगितले.
हा चित्ररथ संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावागावांमध्ये फिरवण्यात येणार आहे. याद्वारे ओमायक्रोन आजाराबद्दल उपाय योजना, कोरोनाच्या बूस्टर डोस बाबतची माहिती लोकांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे समाजामध्ये कोव्हीड लसीबाबत असणाऱ्या गैरसमजाबाबत माहिती देण्यात येणार आहे. यावेळी आ. सुभाष देशमुख यांनी कोरना या आजाराला न घाबरता लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, शासनाचे सर्व नियम पाळावे, कोणतेही गैरसमज करून घेऊ नये, जनतेने पहिला व दुसरा तसेच बूस्टर डोस ताबडतोब घ्यावा आणि आला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन केले. याप्रसंगी तहसीलदार, अमोल कुंभार, गटविकास अधिकारी राहुल देसाई, तालुका आरोग्य अधिकारी गायकवाड, हनुमंत कुलकर्णी, आप्पासाहेब मोटे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.


















