सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ निवडणुकीच्या अर्ज छाननी मध्ये माजी अध्यक्ष दिलीप माने, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, संचालक दिपक माळी, सिद्धेश्वर आवताडे, प्रभाकर कोरे यांच्यासह 26 जणांचे अर्ज नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये बाद झाले आहेत.
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या सतरा संचालक मंडळाच्या जागेसाठी क्रियाशील संस्था सभासदांनी निवडलेले प्रतिनिधी या मतदारसंघाच्या 12 जागांसाठी 68 अर्ज, महिला प्रतिनिधी मतदार संघाच्या दोन जागेसाठी 34 अर्ज, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 1 जागेसाठी 5 अर्ज, इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या एक जागेसाठी 13 तर त्या विमुक्त जाती प्रवर्गाच्या 1 जागेसाठी 17 अर्ज दाखल झाले होते.
या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज छाननी सोमवारी जिल्हा दूध संघाच्या सभागृहात झाली निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या उपस्थितीत ही छाननी झाली. या वेळी 35 हरकती दाखल झाल्या होत्या. त्यावर दुपारी तीन वाजता सुनावणी घेण्यात येऊन मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजता निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये 26 जणांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
26 बाद अर्जापैकी रेवती साखरे थकबाकीदार, मीराबाई कसबे, भीमराव कोकरे, शहाजी पाटील यांचे जातीचे प्रमाणपत्र नाहीत, उर्वरित सर्व दूध संघाला मागच्या तीन वर्षात नियमानुसार दूध पुरवठा केला नाही म्हणून अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना कलम 152 ब नुसार येत्या तीन दिवसात विभागीय उपनिबंधक (डेअरी) पुणे यांच्याकडे अपिल करू शकतात त्या अपिलात अर्ज मंजूर झाला तर ते निवडणुकीस पात्र होतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी दिली.















