सोलापूर : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही आज शुक्रवारी होणार आहे. सभा ही ऑफलाईन घेण्यासाठी सर्व सदस्य आक्रमक होते, अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व काही सदस्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन सभा ही ऑफलाईन घेण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी केली मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांवर बोट ठेवले .तर सदस्यांनी दिलीप स्वामी यांना विचारले असता त्यांनी ही अध्यक्ष कांबळे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्याकडे बोट केले. त्यामुळे आता जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही शुक्रवारी दुपारी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. प्रत्येक पंचायत समिती मध्ये सभापती व त्या त्या तालुक्यातील सदस्य यांना बसण्याची तयारी केली आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेचे आक्रमक सदस्य त्रिभुवन धाइंजे हे दुपारी बारा वाजता झेडपीत आले होते, आज काय विशेष?, कोणता विषय मांडणार? तुम्ही सभेला जॉईन होणार नाही का?असे प्रश्न पत्रकारांनी विचारले असता मी अजिबात ‘जीबी’ला जॉईन होणार नाही. ही लोक काय पण करतात, त्यांच्या फायद्याचा विषय मारून नेतात, तुम्ही होता की म्हणून सांगतात, चुकीच्या कामाला साक्षीदार कशाला? असे धाइंजे यांनी सांगत ऑनलाइन सर्वसाधारण सभेला विरोध केला आहे.















