सोलापूर : माढा तालुक्यातील बावी इथल्या सूरज भालचंद्र पाटील या युवा शेतकऱ्याने टेंभुर्णी जवळील अकोले बुद्रुक या गावांमध्ये शेतजमीन घेतली आहे त्या जमिनीवर पारधी समाजाच्या काही लोकांनी कब्जा केला होता त्यासाठी सूरज पाटील यांचे जिल्हा प्रशासन दरबारी हेलपाटे सुरू होते.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ही घटना सोमवारी दुपारी अडीच ते तीन च्या दरम्यान घडली. त्याला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सामाजिक कार्यकर्ते गणेश शितोळे यांच्या गाडीमध्ये घालून सिविल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार त्याला तातडीने आयसीयूमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले.
बराच वेळ तो बेशुद्ध असल्याने डॉक्टरांना सुद्धा याची काळजी होती मात्र सूरज हा ठणठणीत बरा होऊन घरी परतला आहे. त्यामुळे सिव्हिल प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान पाच दिवसानंतर पोलिसांनी सूरज पाटील याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण पोलीस दलातील मोहसीन शेख यांनी फिर्याद दिली असून कलम 309 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.















