सोलापूर : कर्नाटक राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील शाळा-कॉलेजमध्ये मुस्लिम समाजाच्या विद्यार्थिनी साठी हिजाब बंदी केली आहे त्या विरोधात संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण तयार झाले असून सोलापुरातून ही मुस्लिम समाजातून निषेध व्यक्त केला जात आहे. ताज सोशल ग्रुपच्या वतीने संस्थापक अध्यक्ष तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली शहर मध्य अध्यक्ष सिद्दीक वस्ताद, माजी महापौर आरिफ शेख यांच्यासह मुस्लिम समाजातील महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढाव चा नारा देतात मात्र दुसरीकडे त्याच मुलींना शिकू दिले जात नाही. आम्ही हिजाबमध्ये सुरक्षित आहोत. आम्हाला कंफर्टेबल वाटते मग कर्नाटक सरकारने हिजाबला बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला टारगेट केले जात असल्याचे वाटते. संविधानानुसार प्रत्येक नागरीकाला आपल्या समाजाच्या बांधिलकीनुसार राहण्याचा आणि वागण्याचा अधिकार दिलेला असतांना देखील मुलींनी कुठला गणवेश घालावा हे ठरविण्याचा कोणालाही अधिकार नाही.
अशी परिस्थिती असतांना देखील कर्नाटकातील भाजपा प्रणित सरकारने प्रभु रामचंद्राच नांव घेऊन द्रोपदीचा वस्त्रहरण करतांना दिसतात. हे जुल्मी कायदा रद्द झाला पाहिजे. परस्त्री मातेसमान मानणारा आमचा धर्म आहे. मात्र या ठिकाणी धर्माच्या नांवाखाली मुलींची छेडछाड होते हिजाबच्या नांवाखाली मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. हे सरकार स्त्रीयांच्या सन्मानासाठी आहे का स्त्रींना अपमानीत करण्यासाठी आहे हेच कळत नाही.














