सोलापूर : सोलापुरातील सिव्हील हॉस्पिटल कोरूना काळात हजारोंना जीवनदान देणारे हॉस्पिटल. सर्वसामान्य, गोरगरीब, वंचितांसाठी असलेली आरोग्यदायी. एकीकडे असं आशादायी चित्र निर्माण झालं असताना दुसरीकडे मात्र काही ठराविक कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे या हॉस्पिटलचे नाव आता बदनाम होऊ लागले आहे.
एक अतिशय गंभीर बाब समोर आली असून सोलापुर शहरातील बुधवार पेठ इथल्या राकेश मोरे या 20 वर्षीय युवकावर मागच्या चार दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टीबी आजारावर उपचार सुरु होते. मात्र, शनिवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान राकेश मृत झाल्याची माहिती संबंधित डॉक्टरांनी राकेशच्या नातेवाईकांना दिली, त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना एक धक्कादायक प्रकार दिसून आला.
मृत राकेशच्या संपूर्ण शरीराला मुंग्या लागल्या होत्या, राकेशला लावण्यात आलेल्या ऑक्सिजन मास्कला ही मुंग्या लागल्या होत्या. त्यामुळे राकेशच्या मृत्यूस सिव्हिल हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप राकेशच्या नातेवाईकांनी केलाय, याबाबत दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी पोलिसात जाऊन दाद मागणार असल्याची माहिती राकेशच्या नातेवाईकांनी दिली आहे.
















